मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ढाणकीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

 



ढाणकी प्रतिनिधी: वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे किंवा कटआउट्स उभारणे नव्हे, तर तो समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा आणि सेवाकार्याचा दिवस असतो, हाच उदात्त संदेश देत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ढाणकी शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दिनांक २३ जुलै रोजी शहरातील गंदेवार कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या शिबीराचे उद्घाटन ढाणकीचे माजी नगराध्यक्ष सुरेशलाल जयस्वाल यांच्या हस्ते उत्साहात झाले. नांदेड येथील 'नंदीग्राम ब्लड सेंटर अँड कंपोनंट लॅब' यांच्या तांत्रिक सहकार्याने हे शिबीर पार पडले. रक्त हे कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही, ते फक्त माणसाच्या दातृत्वातूनच मिळू शकते," ही भावना उराशी बाळगून ढाणकी व परिसरातील तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी शिबीराला उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी हे जमा झालेले रक्त जीवनदायी ठरणार आहे. सहभागी सर्व रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याचा खरा अर्थ म्हणजे त्यांच्या नावाने गरजूंच्या आयुष्यात प्रकाश पसरवणे, हा विचार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. या शिबीरास भाजपचे माजी शहराध्यक्ष सुरेशलाल जयस्वाल, भाजपचे ज्येष्ठ नेते आनंदराव चंद्रे, रमेश गायकवाड, बाळासाहेब गंदेवार, नगरसेवक तथा भाजप शहर अध्यक्ष उमेश योगेवार, नगरसेवक पप्पू निम्मलवाड, नगरसेवक नागेश रातोळे, नगरसेवक प्रतिनिधी साई मंतेवाड, अनिल गंगरपाड, दिगंबरजी बल्लेवार, रमण पाटील रावते, शंकर काळकर, महेश शहाणे, जालिंदर सुरमवाड यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या