ढाणकीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गाची संयुक्त पाहणी महावितरण, नगरपंचायत आणि पोलिसांकडून अडथळे दूर करण्याचे निर्देश.

 


ढाणकी प्रतिनिधी -आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढाणकी शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या विविध समस्या व सूचनांची दखल घेत गुरुवारी पोलीस प्रशासन, महावितरण आणि नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने गणपती आगमन व विसर्जन मिरवणूक मार्गाची संयुक्त पाहणी करण्यात आली.या पाहणीदरम्यान मिरवणूक मार्गावरील लटकणाऱ्या विद्युत तारा, अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या, रस्त्यावरील खड्डे तसेच बांधकामासाठी नागरिकांनी रस्त्यावर ठेवलेली गिट्टी, वाळू आणि विटा आदी बाबींची पाहणी करण्यात आली.

गणेशोत्सव काळात मिरवणुकीदरम्यान नागरिक व भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच वाहतुकीस अडथळा होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना करून मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याच्या सूचना ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या संयुक्त पाहणीवेळी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे, महावितरणचे सहाय्यक प्रफुल चितोळे, सहायक अभियंता मारोती आत्राम, नगरपंचायत अभियंता अशोक देशमुख, बीट जमादार मोहन चाटे, प्रकाश मुंडे, राहुल कोकरे, सुदर्शन जाधव यांच्यासह महावितरणचे लाइनमन आणि नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांनी एकत्रितपणे केलेल्या या पाहणीमुळे मिरवणूक मार्गावरील संभाव्य अडथळे वेळेत दूर होण्यास मदत होणार आहे.


सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

ढाणकी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जुना बस स्टॅन्ड चौकात सध्या बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून त्याठिकाणी नवीन कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी दिली. त्यामुळे गणेशोत्सव काळात परिसरातील हालचालींवर देखरेख ठेवण्यास पोलिसांना मदत होणार आहे.

— पांडुरंग शिंदे, ठाणेदार, बिटरगाव पोलीस स्टेशन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या