ढाणकी प्रतिनिधी-ढाणकी शहरात आगामी बैलपोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ढाणकी पोलीस चौकी येथे ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शांतता समितीची विशेष बैठक घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायींदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत उत्सव काळात शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
उत्सव काळात डीजे वाजविण्यावर पूर्णतः बंदी राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच जुन्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून, उत्सव काळातील मिरवणुकीत सहभागी होण्यास त्यांना पूर्ण बंदी राहणार असल्याचे सांगण्यात आले.
गणेश मंडळांना सर्व परवानग्या मिळविण्यासाठी ढाणकी पोलीस चौकी येथे विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काळातील वादाचे पडसाद उमटू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाकडून ढाणकी शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गणेश मंडळांनी केवळ धार्मिक उत्सव न साजरा करता सामाजिक उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अर्चना सुंदरकांता वासमवार तसेच उपनगराध्यक्ष दत्ता दिगंबर वानखेडे यांच्यासह, शांतता समितीचे सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नागेश महाजन यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार यांनी मानले.

0 टिप्पण्या