ढाणकी प्रतिनिधी :पावसाळा संपल्यानंतर ढाणकी शहरातील विविध भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायतीकडून फॉगिंग अर्थात धूर फवारणी करण्यासाठी दोन वेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिसऱ्यांदा काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाल्यानंतर दर निश्चित करण्यासाठी स्थायी समितीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र आवश्यक गणपूर्ती (कोरम) न झाल्याने ही सभा रद्द करावी लागली.
दरम्यान, फॉगिंगची प्रक्रिया रखडल्याने शहरातील नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. आरोग्य विभागाकडून कीटकशास्त्रीय सर्वेक्षण केले जात असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्ष धूर फवारणी सुरू न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.
डासांची संख्या वाढल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने नगरपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरातील एका लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील सदस्याला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरातील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे फॉगिंगची प्रक्रिया आणखी विलंबित का होत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने हाताळावा आणि शहरात तातडीने फॉगिंग सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरात धूर फवारणी सुरू करण्यासाठी मागील चार महिन्यांपासून पाठपुरावा केला जात आहे. स्थायी समितीच्या सभेला भाजपचे सदस्य उपस्थित होते; मात्र सत्ताधारी नगरसेवक व सदस्य आवश्यक संख्येने उपस्थित नसल्याने सभा रद्द झाली. नागरिकांच्या आरोग्याचा विषय गंभीर असताना फॉगिंगची प्रक्रिया रखडणे योग्य नाही. नगरपंचायतीने लवकरात लवकर धूर फवारणी सुरू करावी.
रोहित वर्मा, नगरसेवक (स्वीकृत)

0 टिप्पण्या