ढाणकी प्रतिनिधी :बिटरगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ किलो ९० ग्रॅम गांजा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण २ लाख २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ७ नोव्हेंबर रोजी ढाणकी ते फुलसावंगी मार्गावर करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिटरगाव पोलीस पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत एक इसम मोटारसायकलवरून गांजा विक्रीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची वरिष्ठांना कल्पना देऊन पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी सापळा रचला. यावेळी संशयित काळ्या रंगाची मोटारसायकल येताना दिसताच पोलिसांनी ती थांबवून दोघांची तपासणी केली. या कारवाईत संतोष लक्ष्मण कर्णेवाड (वय ३२, रा. वसंतनगर, नांदेड) आणि शेख अफताब जानू शहा (वय १९, रा. फुलसावंगी, ता. महागाव) यांच्याकडून खाकी रंगाच्या पॅकेटमध्ये मळकट हिरवट रंगाचा १ किलो ९० ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त गांजाची किंमत २१ हजार ८०० रुपये असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि दोन मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी बिटरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी), २०(बी)(२)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास बिटरगाव पोलीस करीत आहेत.

0 टिप्पण्या