ढाणकी प्रतिनिधी - दिवसेंदिवस गगनाला भिडणाऱ्या महागाईने सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे कंबरडे मोडले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत असतानाच आता रोजच्या चहा आणि स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या साखरेच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ‘गोड साखर’ आता सर्वसामान्यांसाठी भलतीच ‘कडू’ ठरत आहे. ढाणकी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेल, डाळी, भाज्या आणि गॅस सिलिंडरच्या दरात आधीच मोठी वाढ झाली आहे. त्यात आता साखरेच्या दरानेही उचल खाल्ल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट पार कोलमडले आहे. महिन्याचा किराणा भरताना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. मजुरी आणि रोजगाराचे उत्पन्न वाढलेले नसताना दैनंदिन वस्तूंचे भाव मात्र सातत्याने वाढत आहेत. या भाववाढीमुळे ग्राहकांची खरेदी क्षमता घटली असून किरकोळ बाजारातील खरेदी-विक्रीवरही त्याचा परिणाम जाणवत आहे.
सर्व वस्तूंचे भाव रोज वाढत आहेत. मिळणारी मजुरी तुटपुंजी आणि खर्च मात्र अफाट, अशा परिस्थितीत कुटुंब कसे चालवायचे? असा प्रश्न नागरिकांपुढे उभा आहे.
वाढत्या महागाईवर शासनाने तात्काळ नियंत्रण मिळवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी ढाणकी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

0 टिप्पण्या