ढाणकी प्रतिनिधी : शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याचा दावा शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ढाणकी येथील भारतीय स्टेट बँक शाखा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शासनाने कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा केल्यानंतरही पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेतीची मशागत व इतर आवश्यक खर्च भागविण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असताना कर्जमाफीच्या अटींची पूर्तता करूनही नवीन कर्ज मिळण्यात विलंब होत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संबंधित पात्र शेतकऱ्यांना कर्जवाटपाची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आठ दिवसांत कर्जवाटप सुरू न झाल्यास बँकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या वेळी काँग्रेसचे जिल्हा महासचिव बाळासाहेब चंद्रे पाटील, काँग्रेस ढाणकी शहराध्यक्ष गजानन मिटकरे, माझी शहराध्यक्ष अमोल तुपेकर, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बंटी वाळके, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल नरवाडे, सोसायटीचे संचालक शिवाजी वैद्य, पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ओमाराव चंद्रे, सुनील बुरशे, राजू सावतकर, साजिद भाई, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

0 टिप्पण्या