ढाणकी प्रतिनिधी-
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले तीर्थक्षेत्र माहूर व तेलंगणा राज्यातील विद्येची देवता सरस्वती मातेचे मंदिर असलेले बासर हे दोन्ही तीर्थक्षेत्र रेल्वे मार्ग द्वारे जोडण्याची मागणी ढाणकी चे नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर यांना निवेदनाद्वारे केली.
माहूर येथे असलेले श्री रेणुकामातेचे मंदिर हे पुरातन असून अध्यात्मिक दृष्ट्या त्यांचे महत्व आहे. पूर्वीचे राजे राजवडे यांच्या संस्थानाची व राज्याची राजधानी माहूर होती असा इतिहासात उल्लेख असून त्याचे अस्तित्व दाखवणारे आजही अवशेष तिथे उपलब्ध आहे. दत्तप्रभूंचे जागृत देवस्थान, त्याचप्रमाणे महानुभाव पंथीयांचे चक्रधर स्वामींचे अध्यात्म स्थान, आई अनुसया यांचे निवासस्थान इत्यादी तीर्थक्षेत्र माहूर येथे आहे. त्यामुळे देशभरातील भाविक भक्तांचा ओढा हा माहूर कडे असतो. देवतांचे माहेर घर म्हणून सुद्धा माहूर ला ओळखले जाते. निसर्गाची मुक्त उधळण आणि अध्यात्मिक क्षेत्र यामुळे माहूरला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. त्यामुळे तेलंगणा राज्यातील बासर ते माहूर हा रेल्वेमार्ग होणे गरजेचे आहे. या मार्गासाठी 1985 साली सर्वेक्षण सुद्धा झाले होते.
हा रेल्वेमार्ग बासर,हिमायतनगर, चातारी ब्राह्मणगाव, ढाणकी, फुलसावंगी, माहूर, असा प्रस्तावित होता. बासर ते माहूर हा रेल्वेमार्ग आता होत असलेल्या वर्धा नांदेड या रेल्वे मार्गाला जोडल्यास दोन राज्ये आणि तीन जिल्हे पुन्हा एकदा रेल्वे मार्गाने जोडले जातील व भाविक भक्तांना सुद्धा याचा फायदा होईल असे नगराध्यक्ष सुरेश जैस्वाल यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या रेल्वे मार्ग संदर्भात रेल्वे मंत्रालयाशी बातचीत करण्याचे आश्वासन राज्यमंत्री शांतनु ठाकूर यांनी यावेळी दिले.

0 टिप्पण्या