शेतकामात असताना रानडुकराच्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी सावळेश्वर येथील तरुण धावून आले आहेत. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असलेल्या करुणा दलितानंद काळबांडे यांच्या उपचारासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून २८,६०९ रुपयांचा निधी जमा करून तो त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला. तरुणांच्या या संवेदनशीलतेमुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. सावळेश्वर येथील करुणा काळबांडे या शेतात कापूस वेचणी करत असताना अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळबांडे कुटुंबाची आर्थिक ओढाताण होत असल्याचे पाहून गावातील काही तरुणांनी पुढाकार घेण्याचे ठरवले. मदतीसाठी सावळेश्वरच्या तरुणांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांनी दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला सावळेश्वरसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येकाने आपल्या परीने खारीचा वाटा उचलला आणि पाहता पाहता २८,६०९ रुपये जमा झाले. जमा झालेली ही रक्कम तरुणांनी प्रत्यक्ष करुणा काळबांडे यांच्या कुटुंबीयांकडे सोपवली. "आमच्यासाठी ही मदत केवळ पैसा नसून या संकटाच्या काळात मिळालेला मोठा मानसिक आधार आहे," अशा भावना त्यांच्या कुटुंबाने व्यक्त केल्या. आजच्या काळात जिथे सोशल मीडियाचा वापर अनेकदा विनाकारण केला जातो, तिथे सावळेश्वरच्या युवकांनी एका महिलेच्या मदतीसाठी या माध्यमाचा वापर करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

0 टिप्पण्या