ढाणकी प्रतिनिधी - रात्रीचा घनघोर अंधार, निर्जन माळरान, स्कूल बसचे एकापाठोपाठ दोन्ही टायर पंक्चर आणि बसमध्ये भीतीपोटी व्याकुळ झालेली लहान मुले व महिला... अशा अत्यंत भीतीच्या सावटात प्रसंगामध्ये महागाव आणि बिटरगाव पोलिसांनी दाखवलेली तत्परता माणुसकीचे प्रतीक ठरली आहे. दोन पोलीस ठाण्यांच्या समयसूचकतेमुळे एका संभाव्य मोठ्या संकटाचे निवारण झाले असून, प्रवाशांनी पोलिसांच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. एका खाजगी कार्यक्रमानिमित्त पुसद येथे गेलेली एक स्कूल बस रात्री १:०० च्या सुमारास प्रवाशांना घेऊन ढाणकीकडे परतत जात होती. महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जन माळरानात अचानक या बसचे दोन्ही टायर पंक्चर झाले. गाडी जागची हलणे अशक्य होते. रात्रीची वेळ आणि रस्ता सामसूम असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. बसमध्ये अनेक महिलांच्या अंगावर दागिने होते, तर सोबत असलेली लहान मुले अंधारामुळे प्रचंड व्याकुळ झाली होती. अशावेळी मदतीसाठी कोणीही जवळ नव्हते. या घटनेची माहिती काही प्रतिष्ठित नागरिकांनी तात्काळ बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना फोनवरून दिली. घटनेचे गांभीर्य आणि प्रवाशांची सुरक्षितता ओळखून ठाणेदार शिंदे यांनी तात्काळ महागावचे ठाणेदार धनराज निळे यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थिती सांगितली. ठाणेदार धनराज निळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. त्यांनी आपले सहकारी पोलीस नाईक सुनील माथणे आणि चालक विवेक पारडकर यांना मदतीसाठी पाचारण केले. मध्यरात्री पंक्चरचे दुकान मिळणे कठीण असताना, पोलिसांनी स्वतःच्या वाहनाने जाऊन पंक्चर काढणाऱ्या दुकानदाराला बोलावले आणि त्याचे दुकान उघडून स्वतः उभे राहून पंक्चर काढून घेतले. जोपर्यंत बस दुरुस्त होऊन सुरक्षितरीत्या मार्गस्थ झाली नाही, तोपर्यंत पोलीस पथक तिथेच तैनात होते. "आम्ही अत्यंत घाबरलो होतो, पण पोलिसांनी ज्या प्रकारे धावून येत मदत केली, ते आमच्यासाठी देवदूतापेक्षा कमी नव्हते," अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली. ठाणेदार निळे, ठाणेदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जपलेल्या या माणुसकीचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या