ढाणकीत बेशिस्त वाहनधारकांना पोलिसांचा दणका; २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई, बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास.

 


ढाणकी प्रतिनिधी- परिसरातील ४० पेक्षा जास्त गावांसाठी व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या ढाणकी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले होते. या समस्येची गंभीर दखल घेत बिटरगाव पोलीस आणि वाहतूक विभागाने सोमवारी संयुक्त मोहीम राबवली. या धडक मोहिमेत २१ बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने बेशिस्त चालकांचे धाबे दणाणले आहेत. ढाणकी ही या भागातील मोठी बाजारपेठ असल्याने येथे दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. मात्र, शहरात हक्काची पार्किंग व्यवस्था नसल्याचा फायदा घेत अनेक वाहनचालक आपली वाहने रस्त्यावरच कोठेही उभी करतात. यामुळे बाजारपेठेत पायी चालणेही कठीण झाले होते. स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला केवळ समज देऊन सुधारण्याची संधी दिली होती, मात्र परिस्थिती जैसे थे राहिल्याने अखेर पोलिसांनी ‘अ‍ॅक्शन मोड’ धारण केला. सोमवारच्या आठवडी बाजाराचे औचित्य साधून पोलिसांनी मुख्य रस्त्यावर ही मोहीम राबवली. यावेळी रस्त्यात अडथळा ठरणारी आणि बेशिस्तपणे उभी केलेली २१ वाहने लक्ष्य करण्यात आली. पोलिसांचा ताफा रस्त्यावर उतरताच अनेक वाहनचालकांनी दंड टाळण्यासाठी आपली वाहने गल्लीबोळांतून पळवल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही मोहीम ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गुंडे, वाहतूक जमादार शरद राठोड, अभिषेक इंगळे, अजमल खान, जमादार मोहन चाटे, प्रकाश मुंडे, सुदर्शन जाधव, सुनील शिंदे आणि चंद्रमणी वाढवे यांच्या पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या