ढाणकी प्रतिनिधी - यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने ढाणकी, सावळेश्वर व परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने उभी पिके कोमेजून गेली आहेत. ग्रामीण भागाचे आर्थिक गणित मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर अवलंबून असते. याच पिकाच्या उत्पन्नातून मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक खर्च, मुलींचे विवाह तसेच दैनंदिन आर्थिक नियोजन केले जाते. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनाला मोठा धक्का बसला आहे.
पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीकही संकटात सापडले आहे. त्यातच उमरखेड तालुक्यातील पिकविमा मंजुरीबाबतची अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीसाठी घेतलेले कर्ज अद्याप फेडलेले नसून, उत्पादन घटल्यास कर्जाचा बोजा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पाण्याची पातळी खालावल्याने जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. विहिरी, बोअरवेल आणि लघुसिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने रब्बी हंगामातील पेरणीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावनिहाय पीक नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल तयार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या शेतकरी आर्थिक विवंचनेत असून, कर्जफेड, आगामी हंगामाची तयारी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यांसारखे प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन सरसकट कर्जमाफी, पीक नुकसानीचे पंचनामे, आर्थिक मदत तसेच पिकविम्याबाबत ठोस निर्णय घ्यावा. तसेच खरीप हंगामातील नुकसान भरपाई, रब्बी पेरणीसाठी अनुदानित बियाणे व खते, जनावरांसाठी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

0 टिप्पण्या