ध्येय निश्चित करा, यशाचा मार्ग निवडा- गौरव कायंदे पाटील (IPS)एसडीपीओ उमरखेड, ढाणकीत ३ हजार विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन , ढाणकी शहर पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम; सामूहिक राष्ट्रगानाने भारावले वातावरण.

 


ढणकी प्रतिनिधी :विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य करिअरची निवड करावी, स्पर्धा परीक्षांची तयारी शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करावी तसेच भविष्यातील विविध क्षेत्रांतील संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने ढाणकी शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘करिअरला योग्य दिशा देणारी सुवर्णसंधी’ हा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवारी उत्साहात पार पडला. या उपक्रमाला ढाणकी शहरातील विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढाणकी येथील उत्तम मंगलम कार्यालय, बिटरगाव रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कस्तुरबा गांधी कन्या शाळा, संत गाडगेबाबा आश्रम शाळा, स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय, ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व तब्बल ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सामूहिक राष्ट्रगानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

एमपीएससी , यूपीएससी , नीट , इंजिनीरिंग , पोलीस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांबाबत तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम आपले स्पष्ट ध्येय निश्चित करणे, परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. दैनंदिन अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून त्याची सातत्याने अंमलबजावणी करणे, चालू घडामोडींचा नियमित अभ्यास करणे, वर्तमानपत्र वाचनाची सवय लावणे, केलेल्या अभ्यासाचे नियमित पुनरावलोकन करणे या बाबींचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. कोणतीही परीक्षा एका दिवसात जिंकता येत नाही; सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य दिशा, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावरच ध्येय गाठता येते,’ असा संदेशही मार्गदर्शनातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी केवळ इतरांचे अनुकरण न करता स्वतःची आवड, क्षमता, कौशल्ये आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून करिअरचे उद्दिष्ट निश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे पाटील (IPS), पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुनेश्वर, प्रा. कैलास राठोड, मुख्याधिकारी अजय कुरवाडे, उपअभियंता नरेश बुरुडकर, ठाणेदार पांडुरंग शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ढाणकी येथील प्रगतशील शेतकरी अभय कोठारी होते. विविध वक्त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना करिअर निवडताना केवळ आकर्षणापेक्षा स्वतःची आवड, क्षमता, शैक्षणिक पात्रता आणि उपलब्ध संधी यांचा विचार करण्याचा सल्ला दिला. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्य, योग्य नियोजन, अभ्यासातील शिस्त, सकारात्मक दृष्टिकोन आणि अपयशातून शिकण्याची तयारी या गुणांचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाला राजकीय पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ढाणकी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोसले, उपाध्यक्ष उदय पुंडे, सचिव नागेश महाजन, कोषाध्यक्ष गजानन गंजेवाड, प्रसिद्धी प्रमुख राहुल चोरे, सदस्य ब्रह्मानंद मुनेश्वर, मोहन कळमकर, विनोद गायकवाड, स्वप्नील चिकाटे, पंजाब भूतनर, सुभाष कस्तुरे, नंदकिशोर जाधव, कैलास घुगरे आणि सुनील अक्कावार यांच्यासह पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश महाजन यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या