ढाणकी प्रतिनिधी : उमरखेड तालुक्यातील सोईट (म.) येथे आमदार निधीतून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रार करण्यात आली असून, या कामाची वरिष्ठ स्तरावरून तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी भगवान कोंडबाराव मस्के यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, यवतमाळ यांच्याकडे २९ ऑक्टोबर रोजी निवेदन पाठविले आहे.
आमदार निधीतून होणारी विकासकामे दर्जेदार आणि मंजूर अंदाजपत्रकानुसार होणे अपेक्षित आहे. मात्र, सोईट येथील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याने या कामाची प्रत्यक्ष तपासणी करण्याची मागणी पुढे आली आहे.
रस्त्याचे बांधकाम ठरवून दिलेल्या तांत्रिक निकषांनुसार झाले आहे का, वापरण्यात आलेले साहित्य योग्य दर्जाचे आहे का आणि मंजूर अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण होत आहे का, याची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
तक्रार सादर करूनही कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्टता आलेली नसल्याने संबंधित विभागाकडून आता कोणती कार्यवाही केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या