ढाणकी प्रतिनिधी- बंदी भागात ST महामंडळाकडून नेहमीच नादुरुस्त बसेस पाठवल्या जातात अशी प्रवाशांची ओरड असते. आणि काही अंशी ही बाब खरी ही आहे. अनेक वेळा रस्त्यावर बंद पडलेल्या नादुरुस्त बसेस आपणाला पाहायला मिळतात आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो. अशाच एका नादुरुस्त बसमुळे आज विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागला. स्थानिक कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयातून मुलींना घेऊन जाण्यासाठी महामंडळाची बस आली होती. विद्यार्थिनी बसमध्ये बसल्यानंतर शाळेपासून स्टेट बँकेपर्यंत बस आल्यानंतर अचानकपणे बस बंद पडली. यामुळे काही वेळ स्टेट बँक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. चालकाने बरेच प्रयत्न करूनही बस सुरू न झाल्याने शेवटी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी बसला धक्का मारून गोदाम परिसरामध्ये ढकलत नेले. साधारणता यामध्ये अर्धा ते पाऊण तास गेला. काही काळानंतर पुन्हा चालकाने प्रयत्न केल्यानंतर सदर बस सुरू झाली आणि विद्यार्थिनींना घेऊन गेली. यामुळे पुन्हा एकदा महामंडळाच्या नादुरुस्त बसेसचा मुद्दा ऐरणीवर आला. सदर बस गावातच बंद पडल्याने नागरिकांची मदत मिळू शकली. मात्र जर एखाद्या घाटात किंवा जंगलात बस बंद झाली असती तर एखाद्या अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महामंडळाने बंदी भागाकडे पाठवताना बसेस ह्या चांगल्या स्थितीमध्ये असलेल्याच पाठवाव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.

0 टिप्पण्या