ढाणकी प्रतिनिधी- निसर्गाच्या लहरीपणामुळे ढाणकी परिसरातील अन्नदाता पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. यावर्षी पावसाने दिलेल्या मोठ्या ओढ मुळे परिसरात कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने शेतीचे पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी आर्त मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची परीक्षा घेतली आहे. त्यातच ऐन पिकांच्या वाढीचा काळ असलेला ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने शेतातील उभी पिके डोळ्यांदेखत जळून चालली आहेत. विहिरी आणि बोअरवेल ने तळ गाठल्याने पिकांना पाणी कसे द्यावे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
धानकी परिसरातील शेतकऱ्यांचे मुख्य आर्थिक गणित हे सोयाबीनच्या पिकावर अवलंबून असते. परंतु, पावसाअभावी यावर्षी उभ्या सोयाबीनच्या पिकाला शेंगाच लागल्या नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. हजारो रुपये खर्च करून केलेले बियाणे, खते आणि मशागतीचा खर्चही आता निघणे अशक्य झाले आहे. यामुळे शेतकरी दुहेरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
निसर्गाने तर पाठ फिरवलीच आहे, पण आता सरकारने तरी आम्हाला धीर द्यावा, अशी भावना धानकी परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत. महसूल आणि कृषी विभागाने एसी केबिनमधून बाहेर पडून तातडीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावेत आणि ढाणकी परिसराला दुष्काळी जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील समस्त शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

0 टिप्पण्या