ढाणकीच्या सुरक्षेला प्राधान्य देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार नवीन सीसीटीव्ही कॅमेरे. नागरिकांच्या मागणीला यश. ठाणेदारांच्या पुढाकाराने बंद यंत्रणा पुन्हा कार्यान्वित.


ढाणकी शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अनेक वर्षांपासून बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अखेर पुन्हा सुरू झाले आहेत. नागरिकांच्या अनेक दिवसांच्या मागणीला यश आले असून, आता या ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर पुन्हा एकदा गुन्हेगारांवर राहणार आहे.

या चौकातून ढाणकी शहरात येण्यासाठी आणि ग्रामीण भागात जाण्यासाठी मोठी वर्दळ असते. यापूर्वी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाला अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात आणि आरोपींना अटक करण्यात मदत मिळाली होती. मात्र, काही कारणास्तव हे कॅमेरे बंद पडले होते.

या चौकातील सीसीटीव्हीचे महत्त्व लक्षात घेऊन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्थानिक सोयामील कंपनीशी संपर्क साधून सहकार्याचे आवाहन केले. कंपनीने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत चौकात चार नवीन कॅमेरे बसवून दिले.

आज हे कॅमेरे बसवताना ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, मोहन चाटे, प्रकाश मुंडे, राहुल कोकरे, प्रविण जाधव आणि महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मारोती आग्राम उपस्थित होते.

कॅमेरे बसवल्यानंतर त्याचे रिसीव्हर कुठे ठेवायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, प्रविण जैन यांनी त्वरित पुढाकार घेत रिसीव्हर त्यांच्या येथे ठेवण्याची तयारी दर्शवली आणि एक मोठी अडचण दूर केली.

याचबरोबर, संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील बंद असलेले कॅमेरेही दुरुस्त करून घेण्यात आले आहेत. या सर्व घडामोडींमुळे ढाणकी शहरातील सुरक्षिततेत भर पडली असून, नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या