ढाणकी प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत जाहीर झालेली दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी अनेक शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळाली नसल्याचा आरोप करत ढाणकी शहर काँग्रेस कमिटीने शासनाचा निषेध केला. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अपेक्षेपेक्षा कमी रक्कम जमा झाल्याने ते अद्याप बँकेच्या दप्तरी कर्जदारच असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नवीन पीककर्ज मिळण्यात अडचणी येत असून, कर्जमाफीतील तफावत तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने युनियन बँक ऑफ इंडिया, ढाणकी शाखेचे व्यवस्थापक पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. पात्र शेतकऱ्यांना उर्वरित कर्जमाफीची रक्कम देऊन नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस बाळासाहेब पाटील चंद्रे, शहर अध्यक्ष गजानन मिटकरे, जिल्हा सरचिटणीस खाजा भाई, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष राहुल नरवाडे, ओमराव पाटील चंद्रे, रमेश मुखीरवाड, साजिद भाई यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
NPA कर्ज खात्यात गेलेल्या शेतकरी रमेश मुखीरवाड यांच्यावर १,३५,००० रुपयांचे थकीत कर्ज असताना त्यांच्या खात्यात शासनाकडून केवळ ६५,००० रुपयेच जमा झाले आहेत. अशीच परिस्थिती परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची असून ते संपूर्ण कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. शासनाने अशा अर्धवट कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरित संपूर्ण कर्जमाफी न दिल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
— बाळासाहेब चंद्रे, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस कमिटी यवतमाळ.
ढाणकी शहरातील व बंदी भागातील काही शेतकरी आले होते त्यांना घेऊन बँकेत गेलो आसता शासनाची फसवी कर्ज माफी प्रत्यक्षात दिसून आली.प्रत्यक्षत असलेल कर्ज व मिळालेली कर्ज माफी या मध्ये खूप तफावत आढळून आली त्यामुळे शासनाने उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी अन्यथा बँक समोर आंदोलन करण्यात येईल.
— गजानन मिटकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस कमिटी ढाणकी

0 टिप्पण्या