![]() |
ढाणकी प्रतिनिधी : पोलीस स्टेशन बिटरगावच्या वतीने हद्दीतील ढाणकी येथे भंगार दुकानदारांवर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत चार भंगार दुकानांची कसून तपासणी करण्यात आली असून, संशयित स्वरूपाचा मुद्देमाल आणि 12 संशयित मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत चार मोटारसायकल इंजिन (मोसे), वायरचे बंडल आणि दोन बॅटऱ्या जप्त केल्या. तसेच गावातील इतर ठिकाणांहून आणखी आठ संशयित मोटारसायकल इंजिन ताब्यात घेण्यात आले. याशिवाय एकूण 12 संशयित मोटारसायकली पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशन बिटरगाव येथे आणण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल व वाहनांच्या मालकीची सखोल पडताळणी सुरू असून, संबंधित व्यक्तींकडील आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. ही वाहने किंवा सुटे भाग चोरीचे अथवा इतर कोणत्याही गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
अवैध भंगार व्यवसाय, चोरीच्या वाहनांच्या सुट्या भागांची खरेदी-विक्री आणि मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अशा विशेष तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलीस स्टेशन बिटरगावने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलीस स्टेशन बिटरगावचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, पोहवा मोहन चाटे, रोशन सरनाईक, राजू बेलेयवार, सुदर्शन जाधव, शिवाजी शिंदे, गजानन मस्के, सतीश परतके, इम्रान शेख आणि प्रकाश केंद्रे यांनी संयुक्तपणे पार पाडली.

0 टिप्पण्या