पावसाने पाठ फिरवली, पिके कोमेजू लागली; ढाणकी परिसरात दुष्काळाचे सावट.



मृग नक्षत्राच्या सुरुवातीला काही प्रमाणात हजेरी लावल्यानंतर, ढाणकी परिसरामध्ये पावसाने अचानक पाठ फिरवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे ऐन पिकांच्या वाढीच्या काळात शेतातील पिके कोमेजू लागली आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने, ढाणकी शहरात पुन्हा एकदा पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. सध्या शहराला तब्बल १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, संपूर्ण परिसरावर दुष्काळाचे भीषण सावट पसरले आहे.

यावर्षी चांगला पाऊस होईल या आशेने शेतकऱ्यांनी महागडी बियाणे आणि खते खरेदी करून पेरण्या आटोपल्या होत्या. सुरुवातीला पिके डोलू लागली खरी, मात्र आता ऐन गरजेच्या वेळी पावसाने दडी मारली आहे.  कडक ऊन आणि पाण्याचा अभाव यामुळे पिके शेतातच कोमेजू लागली आहेत. जर पुढील काही दिवसांत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच कर्जबाजारी असलेला बळीराजा या विदारक स्थितीमुळे कमालीचा चिंतेत पडला आहे. पावसाअभावी केवळ शेतीच नाही, तर ढाणकी शहराची पाणी पुरवठा यंत्रणाही कोलमडली आहे. धरणातील आणि विहिरींमधील पाणी पातळी खालावल्यामुळे प्रशासनाला शहरात पाणी वाटप करताना मोठी कसरत करावी लागत आहे.सध्या ढाणकी शहरात तब्बल १५ दिवसांच्या अंतराने नळाला पाणी येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना, विशेषतः महिलांना खाजगी टँकर किंवा विहिरींवर भटकंती करावी लागत आहे. वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईची ही तीव्रता अधिकच जाणवू लागली आहे.

प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी.
परिसरातील पिकांची झालेली दुरवस्था पाहता कृषी विभागाने तात्काळ ढाणकी परिसराची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करावेत किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी संतप्त मागणी ढाणकी परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या