ढाणकी प्रतिनिधी : ढाणकी येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत ‘पीएम श्री’ योजना तसेच इतर शासकीय निधीच्या वापराबाबत काही अनियमितता झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी यवतमाळ जिल्हा परिषद प्रशासनाकडे यापूर्वी तक्रार करण्यात आल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.
मनसेच्या म्हणण्यानुसार, सन २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत शाळेला प्राप्त झालेल्या ‘पीएम श्री’ योजना व इतर शासकीय निधीच्या विनियोगाची सखोल तपासणी करण्यात यावी. यासंदर्भात ९ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज साद करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या तक्रारीवर अपेक्षित पद्धतीने कारवाई झालेली नसल्याचा दावा मनसेने केला असून, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे निर्देश दिल्यानंतरही संबंधित विभागाकडून कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण विभागाची अधिकृत बाजू उपलब्ध झालेली नाही.
मनसेने शाळेतील ‘पीएम श्री’ योजना व इतर शासकीय निधीच्या खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करावे, खर्चाशी संबंधित बिले, व्हाउचर्स, स्टॉक रजिस्टर, बँक व्यवहार तसेच शाळेतील साहित्याची प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच चौकशी निष्पक्षपणे पूर्ण करून त्याचा अहवाल तक्रारदाराला लेखी स्वरूपात देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तक्रारीवर कारवाई करण्यास विलंब झाल्याच्या आरोपाची प्रशासकीय पातळीवर तपासणी करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. चौकशीदरम्यान संबंधित कागदपत्रे व पुरावे सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घेण्यात यावी, असेही मनसे ने म्हटले आहे.
आठ दिवसांत चौकशीची मागणी.
येत्या आठ दिवसांत संबंधित शाळेतील निधी वापराबाबत सखोल चौकशी सुरू न झाल्यास मनसेच्या वतीने यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ‘कुलूप ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने स्मरणपत्राद्वारे दिला आहे.
हे स्मरणपत्र मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, जिल्हा नेते अनिल हमदापुरे, उमरखेड तालुकाध्यक्ष सादिक शेख, तक्रारदार शेख तय्यब आणि सैयद खालिद यांच्या वतीने देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
टीप : या वृत्तातील आर्थिक अनियमिततेसंबंधीचे आरोप हे संबंधित तक्रारदार/मनसेने केलेले आरोप आहेत. त्यांची स्वतंत्रपणे अधिकृत पडताळणी झालेली असल्याचे या वृत्तातून सूचित होत नाही.

0 टिप्पण्या