निसर्गाचे अद्भुत वरदान: सहस्त्रकुंड धबधब्याचे सौंदर्य फुलले; पैनगंगा अभयारण्य खुणावतेय पर्यटकांना.



ढाणकी प्रतिनिधी -निसर्गाचे अद्भुत वरदान लाभलेला प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा आणि लगतचे पैनगंगा अभयारण्य सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत धबधब्याचा फेसाळणारा प्रवाह, सभोवतालचे घनदाट जंगल, हिरवेगार गवताचे गालिचे आणि पक्ष्यांचा सुमधुर किलबिलाट यामुळे संपूर्ण परिसर निसर्गप्रेमींना अक्षरशः भुरळ घालत आहे. सुट्टीच्या दिवशी स्थानिक जिल्ह्यांसह दूरवरून पर्यटक या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

धबधब्याच्या दुसऱ्या बाजूला (मराठवाडा भागात) स्वयंभू शंभू महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. "भक्तांच्या हाकेला धावून जाणारा महादेव" अशी या मंदिराची ख्याती असल्याने, विशेषतः श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा ओढा येथे पाहायला मिळतो. तसेच, भगवान परशुरामाने बाण मारल्यामुळे या धबधब्याची निर्मिती झाली, अशी पौराणिक आख्यायिका या भागातील पूर्वजांकडून सांगितली जाते.

मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भाच्या बाजूने या पर्यटन क्षेत्राचा अपेक्षित विकास झालेला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. राज्य शासनाने विदर्भाच्या बाजूनेही पर्यटन सुविधांचा विकास करावा, जेणेकरून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरवर्षी सहस्त्रकुंड येथे सेल्फीच्या नादात किंवा प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे काही दुर्दैवी अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षेच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. आनंद घेताना स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे, असे कळकळीचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या