ठाणेदार गोपाळ इंद्राळे यांचा अवैध धंद्यांवर कारवाई चा धडाका; दराटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०० हून अधिक कारवाया.


​ढाणकी प्रतिनिधी: यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचे आणि तीन बाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेले दराटी पोलीस स्टेशन नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवर १९९२ साली स्थापन झाले आहे. शेजारील मराठवाड्यातील किनवट तालुक्यात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडल्याने, त्यांनी या जंगलाचा फायदा घेत दराटी हद्दीत आपले बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नव्याने रुजू झालेले ठाणेदार  गोपाळ इंद्राळे यांनी तत्परता दाखवत या अवैध व्यावसायिकांचा डाव उधळून लावला आहे.

​पुसद येथून सुमारे तीन महिन्यांपूर्वी दराटी पोलीस ठाण्यात बदलून आलेल्या गोपाळ इंद्राळे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात आक्रमक मोहीम उघडली आहे. गेल्या तीन महिन्यांत दारू, मटका, जुगार आणि अमली पदार्थांविरोधात तब्बल शंभरहून अधिक कारवाया करण्यात आल्याने अवैध व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

​ धडक मोहिमेत अवैध दारूविरोधात ८० ते १०० गुन्हे दाखल करण्यात आले असून, जुगार व मटक्यावर ९ ते १० कारवाया करण्यात आल्या आहेत. भवानी येथील एका सराईत गुन्हेगारावर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ अन्वये कारवाई करत त्याला एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याशिवाय खरबी परिसरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तीन जणांविरोधात एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

​शाळांच्या १०० मीटर परिसरात पानटपऱ्यांना बंदी

महाराष्ट्र शासन, जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड यांच्या सूचनेनुसार दराटी हद्दीतील २२ गावांमधील शाळांच्या १०० मीटर परिसरात पानटपऱ्या चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. बीट अंमलदार, पोलीस पाटील आणि तंटामुक्त अध्यक्ष यांना गुटखा, तंबाखू, सिगारेट व अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कडक निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस ठाण्याच्या या सातत्यपूर्ण कारवायांमुळे अनेक अवैध धंदेवाल्यांनी आपले बस्तान गुंडाळले आहे.

​"माझ्या कार्यक्षेत्रातील २२ गावांमध्ये दारू, जुगार, मटका आणि अमली पदार्थांना अजिबात थारा दिला जाणार नाही. महिला, गरीब नागरिक आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून कायद्याची कठोर अंमलबजावणी अशीच सुरू राहील."

— गोपाळ इंद्राळे (ठाणेदार, दराटी पोलीस स्टेशन)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या