ढाणकी प्रतिनिधी -उमरखेड तालुक्यातील 'बोरी ते गाडी वळण' या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचा मुख्य भाग मुसळधार पावसामुळे वाहून गेला असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्ता वाहून गेल्याने बोरी, गाडी आणि परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाल्याने वाहने तर दूरच, पण पायी जाणाऱ्या गावकऱ्यांना आणि शाळकरी मुलांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) अद्याप कोणतीही दुरुस्तीची पावले उचललेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
उमरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसनराव वानखेडे हे बंदी परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधी कडून मोठी आश्वासने दिली जातात, मात्र मुसळधार पावसात रस्ते वाहून जाऊन सामान्य जनता अडचणीत सापडल्यावर सांत्वना करायलाही कोणी फिरकत नाही,अशी उद्विग्न प्रतिक्रिया बोरी-गाडी परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली. रस्ता बंद असल्याने रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी, शाळकरी मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी तब्बल १० ते १५ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यास त्याला प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच जबाबदार असतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून वाहतुकीसाठी तात्पुरता पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि रस्त्याचे पक्के काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काही दिवसांत तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

0 टिप्पण्या