ढाणकी प्रतिनिधी-शहरातील घरकुल धारकांचे थकीत हप्ते मिळणे, मालमत्तेवरील अवाजवी कर कमी करणे आणि गावठाण भूखंडांवरील दंडात्मक रक्कम रद्द करणे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ढाणकी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागण्या १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण न झाल्यास, येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर 'बोंब मारो' आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला आहे.या संदर्भातील निवेदन आज २९ जुलै २०२६ रोजी मुख्याधिकारी/नगराध्यक्ष, नगरपंचायत कार्यालय ढाणकी यांना सादर करण्यात आले. नगरपंचायत अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे दुसरे व त्यापुढील हप्ते दीर्घकाळापासून थकीत आहेत. पहिला हप्ता मिळाल्यानंतर नागरिकांनी जुनी घरे तोडून कामे सुरू केली, मात्र पुढील पैसे न मिळाल्याने कामे अर्धवट अवस्थेत आहेत. यामुळे भर पावसाळ्यात व उन्हाळ्यात गरिबांना घरासमोरील मोकळ्या जागेत पाल टाकून उघड्यावर संसार करावा लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या कोणत्याही प्रकारच्या पुरेशा मूलभूत सोयी-सुविधा मिळत नसतानाही, मालमत्तेवर अत्यंत अवाजवी आणि मोठी कर वाढ करण्यात आली आहे. हा वाढीव कर गरिबांच्या माथी मारला जात असून तो सामान्य नागरिकांच्या आर्थिक क्षमतेबाहेर आह.गावठाण भूखंडांच्या (नमुना ८) नोंदी घेण्यासाठी गेले असता, नागरिकांकडून दंड म्हणून हजारो रुपयांची वसुली केली जात आहे. जागा घेताना फसवणूक झालेल्या सामान्य नागरिकांवर हा अतिरिक्त आर्थिक भार टाकणे अन्यायकारक आहे. शहरातील मोकाट जनावरे व गाढवे, कुत्रे यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावे. शहरातील अनेक प्रभागात नादुरुस्त अवस्थेत असलेले वॉल दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा.या निवेदनावर बाळासाहेब चंद्रे पाटील (माजी सभापती बाजार समिती), सादिक शेख (तालुका अध्यक्ष मनसे), जाँटी विणकरे (जिल्हा अध्यक्ष आझाद समाज पार्टी), गजानन मिटकरे (शहर अध्यक्ष काँग्रेस), बाळू योगेवार (शहर अध्यक्ष भाजपा), संतोष मंतेवाड (राष्ट्रवादी शहर अध्यक्ष), संभाजी गोरटकर (तालुका प्रमुख युवा सेना), संबोधी गायकवाड (तालुका अध्यक्ष वंचित आघाडी), सय्यद माजिद (तालुका प्रमुख प्रहार), गणेश नरवाडे (खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष), रमेश गायकवाड (माजी जि. प. सदस्य यवतमाळ), रुपेश भंडारी (तालुका अध्यक्ष व्यापारी आघाडी), राहुल नरवाडे (शहर अध्यक्ष युवक काँग्रेस), मुकुंद जोशी (मनसैनिक ढाणकी), अमोल तुपेकर, बंटी वाळके (अध्यक्ष विविध कार्यकारी सोसायटी), शेख बशीर शेख लाल, विजय वैद्य आणि शेख अनिस शेख महेमूद यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या मुदतीत मागण्या मंजूर न झाल्यास नगरपंचायत आंदोलनाचा इशारा दिला.

0 टिप्पण्या