ढाणकी शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असून जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातही नागरिकांना पंधरा ते वीस दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत आहे. पावसाळ्यात अशी परिस्थिती असेल, तर उन्हाळ्यात काय होईल, याचीच चिंता नागरिकांना सतावत आहे.
नगरपंचायत दर्जाचे शहर असतानाही पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. शहरवासीयांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपंचायत व प्रशासनाची जबाबदारी असताना, या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप होत आहे.
शहरातील नगरसेवकांनीही सभागृहात पाणीप्रश्न अधिक प्रभावीपणे मांडावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सामाजिक माध्यमांवर वारंवार प्रश्न उपस्थित करूनही केवळ आश्वासनांचीच पुनरावृत्ती होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे शहरातील पाणी समस्या कधीच सुटणार नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात एका शहराचा नियमित पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे प्रशासनाला इतके कठीण का जात आहे, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील काही लोकप्रतिनिधी व नेत्यांचे थेट पालकमंत्र्यांशी संपर्क असल्याने त्यांनी तरी हा गंभीर प्रश्न शासनासमोर प्रभावीपणे मांडून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

0 टिप्पण्या