ढाणकी प्रतिनिधी-येथील स्थानिक कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयात आषाढी एकादशी उत्सव २०२६ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींनी आळंदी ते पंढरपूर अशा पारंपरिक वारीचे हुबेहूब दर्शन घडवणारी एक भव्य दिंडी काढली होती.
उत्सवाच्या निमित्ताने शालेय परिसरात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विद्यार्थिनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत (धोती, कुर्ता, नऊवारी साड्या आणि कपाळावर बुक्का) नटून थटून आल्यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. संत ज्ञानेश्वर माउलींच्या दिंडीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री. किशोरजी ठाकूर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. बी. शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे विधिवत पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर वारीला सुरुवात झाली.
ही भव्य दिंडी ढाणकी शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. ठिकठिकाणी विद्यार्थिनींनी विविध वारकरी कलाकृती सादर करून नागरिकांची मने जिंकली.या प्रतिवारीच्या भव्य आयोजनाचा समारोप अत्यंत उत्साहात झाला. या समारोपीय कार्यक्रमाला शहरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष सौ. अर्चनाताई वासमवार, श्री. सूर्यकांत वासमवार, संस्थेचे सहसचिव श्री. किशोरजी ठाकूर आणि मुख्याध्यापिका श्रीमती एस. बी. शिंदे उपस्थित होत्या.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने मोलाचे परिश्रम घेतले. विद्यार्थिनींचा उत्साह आणि भक्तीभाव पाहून उपस्थित पालकांनी व नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

0 टिप्पण्या