जिद्दीला कष्टाची जोड, अकोली तांड्यावरची लेक आरती जाधव पोलीस दलात दाखल. सर्वसामान्य कुटुंबातील मुलीची गगनभरारी.



परिस्थिती गरिबीची असली तरी स्वप्ने मोठी असावीत आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असेल तर आकाशही ठेंगणे वाटते, हेच अकोली तांडा येथील आरती पंडित जाधव या तरुणीने सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये आरतीची निवड नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस मध्ये झाली असून, एका अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलीने खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पूर्ण केल्याने संपूर्ण परिसरात तिचे कौतुक होत आहे. आरतीचे कुटुंब अत्यंत सामान्य असून घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मात्र, अंगात असलेली जिद्द आणि खाकी वर्दीचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते. कोणतीही मोठी साधनसामग्री उपलब्ध नसताना, केवळ स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर तिने पोलीस भरतीचा खडतर प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. मैदानी चाचणी असो वा लेखी परीक्षा, आरतीने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत पोलीस दलात स्थान निश्चित केले. आरतीच्या या यशाची बातमी समजताच अकोली तांडा आणि परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तांड्यावरील एका गरीब कुटुंबातील मुलगी पोलीस झाल्याने ग्रामस्थांनी तिचे जंगी स्वागत केले. आरतीने केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर आमच्या तांड्याचा गौरव वाढवला आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.ग्रामीण भागातील, विशेषतः तांड्यावरील मुलींनी शिक्षणासोबतच प्रशासकीय सेवा आणि पोलीस दलात सहभागी व्हावे, यासाठी आरतीचे यश दीपस्तंभासारखे ठरणार आहे. तिच्या या यशात तिचे वडील पंडित जाधव आणि आईसह कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. आरतीचा कुटुंब समवेत सत्कार करण्यासाठी गावातील नागरिक, बिटरगाव पोलीस स्टेशनचे जमदार संतोष चव्हाण, दत्ता कवडेकर, दराटी पोलीस स्टेशनचे रवी जाधव उपस्थित होते.


माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आई-वडिलांना आणि माझ्या कष्टाला देते. गरिबी असली तरी प्रयत्न सोडले नाहीत तर यश नक्की मिळते, हेच मला इतर मुलींना सांगायचे आहे.

— आरती पंडित जाधव (नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या