ढाणकीत पाणीटंचाईवरून महिला आक्रमक. संतप्त नागरिकांनी नगरध्यक्षांना घातला घेराव! 2 जूनपर्यंत समस्या न सुटल्यास तीव्र ठिय्या आंदोलनाचा इशारा.

 


ढाणकी प्रतिनिधी-शहरात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई आणि नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवार, २५ मे रोजी नगरपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी थेट नगराध्यक्ष अर्चना वासमवार यांना घेराव घालत नगरपंचायतीतच ठिय्या मांडला. प्रभारी मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने काही काळ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले असून, येत्या २ जूनपर्यंत पाणी समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरात सध्या नगरपंचायतीकडून महिन्यातून फक्त एकदाच पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. भीषण उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांसह सर्वसामान्य नागरिकांना आपली दैनंदिन कामे आणि मजुरी सोडून भटकंती करावी लागत आहे. एकीकडे नगरपंचायत प्रशासन या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असताना, सर्वसामान्य जनतेला पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गांजेगाव येथील पैनगंगा नदीवरून ढाणकी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराला देऊनही ते अद्याप अपूर्णच आहे. लाखो रुपये खर्च करूनही लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यातच, ऐन पाणीटंचाईच्या काळात पाणीपुरवठा अभियंता रजेवर गेल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला. आंदोलकांनी हातात 'बेशरमाचे झाड' घेऊन प्रशासनाचा निषेध केला आणि तात्काळ शहराला तातडीने १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा. गांजेगाव नदीवरील जलवाहिनी व जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करावी.प्रत्येक प्रभागात नवीन हातपंप तयार करावेत.कर्तव्यात कसूर करणाऱ्या पाणीपुरवठा अभियंत्यांवर तात्काळ कारवाई करावी इत्यादी मागण्या केल्या. येत्या २ जून २०२६ पर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास नगराध्यक्षांच्या घरासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहील, असा थेट इशाराही निवेदनातून देण्यात आला.या आंदोलनात आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष जॉन्टी विणकरे, मनसे तालुकाध्यक्ष शेख सादिक शेख अम्मू, शेख शब्बीर, सीमा गायकवाड, सूर्यका विणकरे, वंदना सावतकर, पूजा गायकवाड, पिंकी गायकवाड, रमेश कदम, आशा गायकवाड, सविता कारिन्दे, सुजाता धुळे, राजेश गायकवाड, मीनाक्षी राऊत, कविता भगत, संगीता घुगे, लता गायकवाड, प्रतिभा सावतकर, साधना लामटिवळे, तसेच शाहनूर, सायरा, वैदा, जकिया, शबाना, शारदा, मुमताज यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या