ढाणकी प्रतिनिधी -महागाव तालुक्यातील वडद येथील रहिवासी आणि सक्रिय गोरक्षक गजानन सुरोशे यांची गोवंश तस्करांनी निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या थरारक घटनेचे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले असून, जनसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या क्रूर हत्येचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी आज ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन सुरोशे हे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात गोवंश रक्षण आणि बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी सक्रियपणे काम करत होते. नेहमीप्रमाणे गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ती रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिडलेल्या गोवंश तस्करांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोरक्षकाची अशा प्रकारे हत्या झाल्याचे समजताच परिसरात प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला ढाणकी शहरातील व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि हॉकर्स यांनी स्वतःहून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून १००% उत्स्फूर्त पाठिंबा दिला. शहरात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या असून मुख्य बाजारपेठेसह सर्व रस्ते ओस पडले आहेत. घटनेचे गांभीर्य आणि नागरिकांमधील तीव्र संताप लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे, उपनिरीक्षक सागर अन्नमवार यांनी चोख बंदोबस्त दिला होता. सध्या शहरातील परिस्थिती तणावपूर्ण शांततेची असून पोलीस प्रशासन प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे. गोवंश तस्करांची वाढलेली हिंमत आणि गोरक्षकाची झालेली हत्या ही कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी आहे,अशा तीव्र भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून, सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे.

0 टिप्पण्या