प्रशासकीय कसरतीला अखेर यश, पैनगंगा नदीचे पाणी ढाणकीत दाखल. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर नादुरुस्त मुख्य जलवाहिनी सुरू.

 


ढाणकी प्रतिनिधी - येथे गेल्या काही काळापासून निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना अखेर मोठे यश आले असून, अनेक वर्षांपासून बंद आणि नादुरुस्त असलेली मुख्य जलवाहिनी दोन महिन्यांच्या अथक कसरतीनंतर यशस्वीपणे सुरू करण्यात आली आहे. यामुळे पैनगंगा नदीचे पाणी थेट ढाणकी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले असून, जीवन प्राधिकरण योजने च्या माध्यमातून ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारलेल्या नवनियुक्त नगराध्यक्ष अर्चना सुंदरकांता वासमवार आणि उपनगराध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे यांनी ढाणकीकरांची तहान भागवण्यासाठी या बंद पडलेल्या योजनेचा विशेष पाठपुरावा केला होता. माजी पालकमंत्री मनोहररावजी नाईक यांनी खनिजकर्म निधीतून १ कोटी १४ लाख रुपये खर्च करून ही महत्त्वाकांक्षी जीवन प्राधिकरण योजना मंजूर केली होती. मात्र, तांत्रिक बिघाड आणि देखभालीअभावी ही वाहिनी अनेक वर्षांपासून धूळ खात पडून होती. ही यंत्रणा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पाणीपुरवठा सभापती, सर्व नगरसेवक, तसेच कर्मचारी बाळू मुरादे, प्रमोद गायकवाड आणि अशोक वाळूकर यांनी  मेहनत घेतली. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आले असले तरी नागरिकांच्या घराघरांत प्रत्यक्ष नळाद्वारे पाणी पोहोचण्यासाठी आणखी 8 ते 10 दिवस वाट पाहावी लागणार आहे. गावातील अंतर्गत पाणी पुरवठ्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. सध्या गावातील जुन्या 3 इंची पाईपलाईनवर एकूण 144 वॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. दररोज 10 वॉल्व्ह सुरू केले, तरी संपूर्ण गावातील सर्व भागांत पाणी पोहोचण्यासाठी किमान 14 दिवसांचा कालावधी लागतो.दरम्यान, ढाणकी गावातील ही जुनी आणि कालबाह्य झालेली अंतर्गत वितरण प्रणाली सध्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. जोपर्यंत ही संपूर्ण जुनी पाणी वितरण व्यवस्था बदलून नवीन वितरण प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित केली जात नाही, तोपर्यंत येथील नागरिकांना नियमितपणे किंवा दिवसाआड शुद्ध पाणी देणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने आता या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न करता, नवीन वितरण व्यवस्थेसाठी कायमस्वरूपी व यशस्वी तोडगा काढावा, अशी मागणी संबंधित विभागाकडून आणि सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या