माणसाने जर मनाशी जिद्द बाळगली आणि कष्टाची तयारी ठेवली, तर यशाचे शिखर दूर नसते, हे ढाणकी जवळील सोईट महागाव येथील सुपुत्राने सिद्ध करून दाखवले आहे. वाशिम पोलीस दलात कार्यरत असलेले अविनाश पुंजाराम बुरलेवाड यांनी खात्यांतर्गत फौजदार परीक्षेत देदीप्यमान यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे सोईटसह उमरखेड तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अविनाश यांचा प्रवास अत्यंत मेहनती आणि प्रेरणादायी आहे. सन 2016 मध्ये त्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात वाशिम पोलीस दलात भरती होऊन शासकीय सेवेला सुरुवात केली होती. मात्र, केवळ पोलीस शिपाई पदावर थांबून न राहता, खाकी वर्दीवर 'स्टार' लावण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. पोलीस कर्तव्याचा ताण आणि वेळेचे नियोजन करत त्यांनी अभ्यासाचे सातत्य कायम ठेवले. गेल्या पाच वर्षांपासून अविनाश यांनी जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास केला. खात्यांतर्गत होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी रात्रं-दिवस एक केले. ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असूनही, कोणत्याही अडचणींना न डगमगता त्यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आता एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आपल्या या यशाबद्दल बोलताना अविनाश यांनी अत्यंत विनम्रतेने याचे श्रेय आई वडील आणि कुटुंबीय , प्रा. लाभशेटवार सर, विकास माने, प्रा.विठ्ठल राठोड सर, ठाणेदार API श्रीदेवी पाटील मॅडम, म. पो. अमोल काचेवाड., म. पो. नागोराव खंडके, म. पो. चंदन राठोड, म. पो. श्याम दुतोंडे, Psi गणेश सूर्यवंशी, psi सत्यजीत मानकर.शिवराज हिंगमिरे, म.पो.तेजस चौधरी, म.पो.निकीन चोपडे, म. पो.बन्सी चव्हाण, एफ.जी. लक्ष्मण गुंफलवाड, एफ जी राजू चिंतलवाड,नितीन राठोड, विष्णू तागड यांना दिले आहे. मार्गदर्शकांच्या योग्य सल्ल्यामुळे आणि परिश्रमामुळेच आज हे स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. अविनाशचे हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नसून, ग्रामीण भागातील प्रत्येक त्या विद्यार्थ्यासाठी प्रेरणा आहे जो प्रतिकूल परिस्थितीत स्वप्न पाहतो. त्याची जिद्द आणि सातत्य खरोखरच कौतुकास्पद आहे.

0 टिप्पण्या