अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना, ढाणकी शहरातही या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला. 30 एप्रिल रोजी आंबेडकरी संघटनांसह अनुसूचित जातीतील विविध 59 पोटजातींच्या बांधवांनी एकत्र येत भव्य निषेध रॅली काढली. या रॅलीद्वारे राज्य सरकारचा निषेध करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिटरगाव पोलीस स्टेशनमार्फत मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले.
आंदोलकांनी आपल्या निवेदनात प्रामुख्याने न्यायमूर्ती अनंत बदर समिती बरखास्त करून त्यांचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अधिकृत जनगणना होत नाही, तोपर्यंत 'अ, ब, क, ड' अशा उपवर्गीकरणाला स्थगिती द्यावी. प्रत्येक पोटजातीचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करणारा वस्तुनिष्ठ सांख्यिकीय डेटा सरकारने सादर करावा इत्यादी मागण्या केल्या.
उपवर्गीकरण हा अनुसूचित जातीतील 59 जातींमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याचे यावेळी आंदोलकांनी म्हटले आहे. स्थानिक बौद्ध विहारापासून या निषेध रॅलीला सुरुवात झाली. महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केल्यानंतर, शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली. यावेळी उपवर्गीकरणाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये मा. जि.प. सदस्य रामराव गायकवाड, माजी सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, शिवसेना शहराध्यक्ष सुंदरकांता वासमवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष जॉन्टी विणकरे, नगरसेवक रवी ढोबळे, नगरसेवक एजाज शेख., माजी पं.स. सदस्य रमेश गायकवाड, माजी सभापती संबोधी गायकवाड, पत्रकार ब्रह्मानंद मुनेश्वर, पत्रकार विनोद गायकवाड, महेंद्र कावळे, बामसेफचे अमोल पाटील, चर्मकार संघाचे गजानन सुरोशे, कैलास राऊत याव्यतिरिक्त अक्षय भगत, शुभम मुनेश्वर, रामजी गायकवाड, रुपेश गायकवाड, विवेक काशीनंद, आकाश राऊत, मयूर गायकवाड, अवधूत मांजरे यांसह बुरुड समाज, होलार समाज आणि विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या