बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनयभंग आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुधाकर माधव कांबळे (45, रा. खरुस बु.) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आरोपी सुधाकर कांबळे याच्यावर बिटरगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११९(१), २९६, ३५१(२)(३) सह वाढीव कलम ७४, ७६ आणि ३४२(४) नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून अटकेच्या भीतीने आरोपी फरार झाला होता. पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. आरोपीने आपला ठावठिकाणा बदलून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी हिमायतनगर (जि. नांदेड) परिसरात लपून बसला आहे. विलंब न लावता बिटरगाव पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून हिमायतनगर गाठले. तिथे सापळा रचून आरोपीला शिताफीने अटक केली. अटकेनंतर आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी आणि गुन्ह्याची व्याप्ती तपासण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. सदरची मोठी कारवाई ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. अन्नमावर, रवी गिते, पोका राजू बेलेवार, प्रवीण जाधव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या