प्रशासकीय सेवा पोहचली जनतेच्या दारी, ढाणकीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न. प्रलंबित प्रकरणांचा जागीच निपटारा.


महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत ढाणकी (ता. उमरखेड) येथे आयोजित करण्यात आलेले विशेष शिबिर बुधवारी (दि. 29) मोठ्या उत्साहात पार पडले. प्रशासकीय कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या सामान्य नागरिकांना या शिबिरामुळे मोठा दिलासा मिळाला असून, अनेक प्रलंबित प्रकरणांचा जागीच निकाल लावण्यात आला. उमरखेडचे तहसीलदार श्री. सुरडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. वानखेडे साहेब उपस्थित होते. यावेळी ढाणकी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई सुंदरकांत वासमवार, उपाध्यक्ष श्री. दत्त दिगंबर वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. वसंतराव (बाळू) पाटील चंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. रमेश गायकवाड आणि श्री. बळवंतराव नाईक , भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे रोहित वर्मा यांची विशेष उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वसंतराव ऊर्फ बाळू पाटील चंद्रे म्हणाले की, यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असून अतिवृष्टी होऊनही जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामधील शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे, तरी शासनाने त्वरित पिक विमा मंजूर करण्याची त्यांनी यावेळी प्रशासनाकडे मागणी केली. त्याचप्रमाणे राशन कार्ड, कामगार समस्या, घरकुल इत्यादी विषयावरही त्यांनी बोलून नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ महसूलच नव्हे, तर कृषी, आरोग्य आणि कामगार विभागाचे अधिकारी-कर्मचारी देखील येथे उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करून कागदोपत्री प्रकरणांवर त्वरित निर्णय घेण्यात आले.विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरणे आणि त्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचे काम यावेळी करण्यात आले. अशा शिबिरांमुळे सामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी शहराच्या ठिकाणी हेलपाटे मारण्याची गरज उरत नाही. प्रशासन स्वतः जनतेच्या दारी आल्यामुळे कामात पारदर्शकता आणि वेग येतो असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. नायब तहसीलदार श्री. पंडित साहेब, मंडळ अधिकारी श्री. वाघमारे साहेब, ग्राम महसूल अधिकारी आणि सर्व महसूल सेवकांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. ढाणकी नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांनी देखील या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी महसूल विभागाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या