भक्तिमय वातावरणात ढाणकी नगरी न्हाऊन निघाली; श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी व शिवमहापुराण सोहळा उत्साहात संपन्न.


येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आणि शिवमहापुराण कथा अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडला. केंद्र प्रमुख सौ. पूनम ताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याने संपूर्ण ढाणकी परिसरात भक्तीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रमाची सुरुवात 5 एप्रिल रोजी पाचोरा धामच्या शिवयोगिनी जया महादेव शंकर यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराणकथेने झाली. पाच दिवस चाललेल्या या कथाश्रवणासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिवयोगिनींच्या रसाळ निरूपणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. 9 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने विविध याग करण्यात आले. सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे 7 दिवस अहोरात्र चाललेला अखंड जप. दोन-दोन सेवेकऱ्यांच्या संचाने दिवस-रात्र स्वामी मंत्राचा जप, स्वामी चरित्र वाचन आणि विना वादन करून हा नामजप यज्ञ पूर्ण केला. तसेच, 55 सेवेकऱ्यांनी एकाच वेळी सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण वाचन करून स्वामी चरणी आपली सेवा अर्पण केली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते केंद्रातील बाल सेवेकरी. कु. ईश्वर, शुभ्रा, अक्षरा आणि चि. आराध्य यांनी आपल्या खाऊच्या पैशातून गुरुमाऊलींसाठी आणलेली भेट केंद्रात होणाऱ्या सुसंस्कारांची साक्ष देत होती. गुरुमाऊली जया महादेव शंकर यांनी ही भेट आनंदाने स्वीकारली. या सोहळ्यासाठी देऊळगाव राजा येथून साधनाताई वैद्य, जालना येथून धर्मराज दादा शिंदे आणि अनिल दादा तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी गुरुमाऊलींची साखर, गूळ आणि पेढ्यांनी तुला करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या