ढाणकी ते उमरखेड या मुख्य मार्गाचे काम सध्या कासव गतीने सुरू असून, हे काम प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. रस्त्यावर टाकलेल्या कच्च्या मुरमामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे वाहनचालकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मुरूम टाकून ठेवण्यात आला आहे, परंतु त्यावर नियमित पाणी फवारणी केली जात नाही. परिणामी, एखादे मोठे वाहन गेले की धुळीचे एवढे मोठे लोट उठतात की मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराला समोरील रस्ताच दिसत नाही. यामुळे या मार्गावर किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले असून, दुचाकीस्वारांच्या डोळ्यांत धूळ जाऊन गंभीर इजा होण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याकाठी असलेल्या गावांमधील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये धुळीचे थर साचले आहेत. यामुळे लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे विकार, सततचा खोकला आणि डोळ्यांच्या ॲलर्जीचा त्रास सुरू झाला आहे. विकासाच्या नावाखाली जनतेचे आरोग्य धोक्यात घालण्याचा हा प्रकार थांबणार कधी? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. बांधकाम सुरू असताना रस्त्यावर दिवसातून किमान तीन-चार वेळा पाणी फवारणे बंधनकारक आहे. मात्र, कंत्राटदाराकडून खर्चात कपात करण्यासाठी या नियमाला केराची टोपली दाखवली जात आहे. केवळ नफ्यासाठी प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत.

0 टिप्पण्या