बिटरगाव पोलिसांची मोठी कारवाई, हळद चोरट्याला 24 तासांत बेड्या.मुद्देमालही जप्त


सध्या सोन्याचा भाव खात असलेल्या हळदीवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याचा बिटरगाव पोलिसांनी छडा लावला आहे. ढाणकी येथील शेतातून चोरलेली हळद जप्त करत पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. ढाणकी येथील शेतकरी शेख हमीद शेख फकरू यांच्या शेतातून काल रात्री अज्ञात चोरट्यांनी 2 क्विंटल हळदीची पोती लांबवली होती. बाजारभावानुसार या हळदीची किंमत 24000 रुपये इतकी होती. शेतकऱ्याने तातडीने बिटरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. हळदीचे वाढते दर पाहता ही चोरी परिसरात चर्चेचा विषय बनली होती. ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी तातडीने विशेष पथक तयार केले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई चिंचोली येथील देवानंद संभाजी गायकवाड (वय 35) याच्याकडे वळवली. सुरुवातीला पोलिसांनी विचारपूस केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण हळद जप्त केली आहे. ही यशस्वी कारवाई ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सागर अन्नमावर,पोलीस कर्मचारी, मोहन चाटे, सुदर्शन जाधव, शरद चव्हाण, राहुल कोकरे, रवी गिते यांनी केली .


शेतकऱ्यांनी सावध राहावे...

शेतमालाच्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. मात्र, शेतकऱ्यांनीही आपल्या मालाची सुरक्षितता वाढवावी. शेतात किंवा परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

— पांडुरंग शिंदे (ठाणेदार, बिटरगाव)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या