संकट काळात जो धावून येतो तोच खरा देवमाणूस याचा प्रत्यय नुकताच अकोली येथे आला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कॅन्सरशी झुंज देणाऱ्या तुळसाबाई मारोती सोळंके यांच्या मदतीसाठी समाज सढळ हाताने पुढे आला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या काही दिवसांत २४,२०० रुपयांचा निधी जमा झाला आहे. तुळसाबाई सोळंके यांचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. त्यातच त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासल्यामुळे कुटुंबावर आभाळ कोसळले होते. घरची आर्थिक ओढताण आणि उपचारांचा मोठा खर्च यामुळे तुळसाबाईंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. उपचारांसाठी पैसे नसल्याने त्यांचे कुटुंब हतबल झाले होते. तुळसाबाईंची ही व्यथा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल राठोड यांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मदतीचे आवाहन केले. फूल ना फुलाची पाकळी या भावनेतून प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन करत त्यांनी स्वतःचा स्कॅनर आणि संपर्क क्रमांक दिला. या आवाहनाला अकोली व ढाणकी परिसरातील दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तुळसाबाईंवर उपचार सुरू झाले असून, मिळालेल्या मदतीमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाला आहे. अशाच प्रकारे समाजातील इतर गरजूंसाठीही तरुणांनी आणि दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अकोलीकरांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या