हलाखीच्या परिस्थितीवर मात करून फुलले हास्य. हदगावच्या तळंगचा अवधूत बनला सोशल मीडिया स्टार.

परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर आभाळाला गवसणी घालता येते, हे हदगाव तालुक्यातील तळंग येथील एका 25 वर्षीय तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. अवधूत पांडुरंग पौळ असे या युवकाचे नाव असून, आपल्या अनोख्या विनोदी शैलीतील 'रील्स'च्या माध्यमातून त्याने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकताच अवधूत ढाणकी येथे  मामीडवार मोटर्स शोरुम मध्ये प्रमोशनसाठी आला होता त्यावेळी त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला. अवधूतचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची, घरी कोरडवाहू दीड एकर शेती, त्यामुळे प्रचंड आर्थिक ओढाताण होत होती. वेळप्रसंगी अवधूत ने मोल मजूरी चे सुद्धा काम केले मात्र स्वतः मधल्या कलाकाराला त्यांने मरू दिले नाही. ग्रामीण भागातील मर्यादित साधने असतानाही त्याने हार मानली नाही. आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देत त्याने मोबाईलच्या कॅमेऱ्यातून ग्रामीण जीवन आणि विनोदी प्रसंगांचे चित्रीकरण सुरू केले. सुरुवातीला छंद म्हणून सुरू केलेला हा प्रवास आज एका यशस्वी रिल स्टार च्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.अवधूतने तयार केलेले विनोदी रील्स सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. त्याचे साधे वागणे, नैसर्गिक अभिनय आणि संवादफेक यामुळे ग्रामीण भागासह शहरातील प्रेक्षकही त्याचे चाहते झाले आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता तो आज सोशल मीडियाचा नवा किंग ठरत आहे. त्याच्या प्रत्येक व्हिडिओवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत असून, ग्रामीण भागातील टॅलेंटला योग्य व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. केवळ करमणूकच नाही, तर प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःची ओळख कशी निर्माण करावी, याचा आदर्श अवधूतने परिसरातील तरुणांसमोर ठेवला आहे. तळंगसारख्या छोट्याशा गावातून निघून थेट सोशल मीडियाच्या मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या या अवधूतचे  कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या