शाळेचे काम आटोपून परतताना काळाचा घाला. म्हैस आडवी आल्याने शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू. ढाणकी परिसरात हळहळ.

शाळेच्या कामासाठी गेलेल्या एका कर्तव्यदक्ष शिक्षकाचा परतीच्या प्रवासात रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ढाणकी परिसरात घडली आहे. रस्त्यात अचानक म्हैस आडवी आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून हा भीषण अपघात झाला. ओमकार उर्फ ओमप्रकाश मारोती बोरीकर (वय 40) असे मृत शिक्षकाचे नाव असून, या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात आणि परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार बोरीकर हे मूळचे बोरीवन येथील रहिवासी असून सध्या ढाणकी येथे वास्तव्यास होते. ते टेंभुरदरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. 7 मार्च 2026 रोजी शाळेत बोअरिंगचे काम असल्याने, ते दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांचे सहकारी शिक्षक रामदास शेळके यांच्यासोबत शाळेत गेले होते. दिवसभर शाळेचे काम आटोपून सायंकाळी 7.45 वाजताच्या सुमारास बोरीकर आपल्या दुचाकीने ढाणकीकडे परतत होते. ढाणकी गावाजवळ आले असता, अचानक एक म्हैस रस्त्यावर आडवी आली. अंधार असल्याने आणि म्हैस अचानक समोर आल्याने बोरीकर यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते वेगाने खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बिट्टरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे आणि जमादार मोहन चाटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. डॉ. स्वाती मुनेश्वर यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. मयत ओमकार बोरीकर यांच्या पश्चात पत्नी, 10 वर्षांचा मुलगा, 14 वर्षांची मुलगी आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. त्यांचे मोठे बंधू केशव मारोती बोरीकर (शिक्षक, रा. सावरगाव) यांनी या घटनेची फिर्याद बिट्टरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या