येथील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते पुंजाराम हटकरे (वय अंदाजे 65) यांचे गुरुवार, दिनांक ५ मार्च २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने जेवली परिसर व पत्रकारिता क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. पुंजाराम हटकरे यांना सामाजिक कार्याची विशेष आवड होती. लोकमत वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. विशेषतः बंदीभागातील जनसामान्यांच्या समस्या, शेतीचे प्रश्न आणि मूलभूत सुविधांचा अभाव या विषयांवर त्यांनी आपल्या लेखणीतून प्रभावीपणे प्रकाश टाकला. प्रशासनाचे लक्ष वेधून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जेवली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या