मोठी बातमी: दशकांपासून रखडलेल्या 'सहस्रकुंड' प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार! ३१ हजार हेक्टर जमीन भिजणार; पण...


ढाणकी प्रतिनिधी - गेल्या अनेक दशकांपासून केवळ कागदावरच असलेल्या सहस्रकुंड जलविद्युत आणि सिंचन प्रकल्पाला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. ढाणकीचे माजी नगराध्यक्ष सुरेश नारायणलाल जयस्वाल यांनी प्रशासनाकडे लावलेल्या धडाकेबाज पाठपुराव्यामुळे हे शक्य झालेले आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदर माहिती दिली. यामुळे प्रकल्पाचे सकारात्मक चित्र समोर आले असून, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

काय आहे प्रकल्पाचे स्वरूप?

पैनगंगा नदीवर मौजे कोठा तांडा येथे हा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत- २० मेगावॅट (20 MW) जलविद्युत निर्मितीचे नियोजन, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील तब्बल ३१ हजार ६०४ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार, १०.३० कि.मी. लांबीचा कालवा आणि बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. तसेच या प्रकल्पामुळे ढाणकीची पाणी समस्या सुता कायमची मिटेल असे माजी नगराध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. मिळालेल्या माहिती नुसार, राज्य तांत्रिक सल्लागार समितीची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव 'महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणा'कडे (MWRRA) सादर करण्यात आला आहे. यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

महामार्गाचा 'खोळंबा':भूसंपादनाचा पेच कायम.

एकीकडे सिंचन प्रकल्पाचा मार्ग मोकळा होत असताना, दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग ७५२-आय च्या कामात मात्र अडथळा निर्माण झाला आहे. हिरामन नगर ते निग्नूर दरम्यानच्या वळण रस्त्यासाठी आवश्यक असलेली जमीन ई-वर्ग, वर्ग-१, वर्ग-२ आणि वनविभागाच्या अखत्यारीत आहे. "भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण न झाल्यास महामार्गाचे काम दीर्घकाळ रखडण्याची भीती आहे," असा इशारा सुरेश जयस्वाल यांनी प्रशासनाला दिला आहे तसेच वेळ पडल्यास न्यायालयात सुद्धा दाद मागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एकीकडे सिंचन प्रकल्पामुळे शेतीचा कायापालट होणार आहे, तर दुसरीकडे महामार्गामुळे दळणवळण सोपे होणार आहे. या दोन्ही कामांसाठी वन विभाग आणि भूसंपादन विभागाची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे. माजी नगराध्यक्षांच्या या दुहेरी पाठपुराव्यामुळे ढाणकी परिसराच्या विकासाला 'बूस्टर डोस' मिळण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये, भाजपाचे जेष्ठ नेते आनंदराव चंद्रे, पंचायत समिती उमरखेड च माजी उपसभापती खाजाभाई कुरेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम चिन्नावार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश कुचेरिया व नागरिक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या