ढाणकी प्रतिनिधी- येथील मुरली बंधाऱ्यात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका ३० ते ४० वयोगटातील तरुणाच्या मृतदेहाचे गूढ ११ दिवस उलटूनही कायम आहे. मृताची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले असून, आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र ओलांडून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचला आहे. मृताचा चेहरा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून बिट्टरगाव पोलिसांनी पुणे येथील तज्ज्ञांकडून मृताचे 'डिजिटल स्केच' तयार करून घेतले आहे. या स्केचच्या आधारे आता विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी परिसरातील चार संशयित बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबांची माहिती घेतली आहे. त्यांच्या आई-वडिलांचे DNA नमुने संकलित करण्यात आले असून, ते मॅच करण्यासाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यामुळे मृताची ओळख पटण्यास मोठी मदत होण्याची शक्यता आहे.
तेलंगणा कनेक्शन: कपडे आणि पोत्यावरून तपास
मृताच्या पॅंटवर 'सिटी मेन्स टेलर' असा लोगो आहे. हा टेलर तेलंगणा राज्यातील असून, ४-५ वर्षांपूर्वीचा हा लोगो असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ज्या पोत्यात मृतदेह भरून फेकला होता, ते पोते तेलंगणातील भैसा येथील एका विक्रेत्याने विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मारेकऱ्यांनी खून केल्यानंतर ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून पाण्यात फेकून दिला होता. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने डॉक्टरांना घटनास्थळीच शवविच्छेदन करावे लागले होते.
सध्या बिट्टरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक युद्धपातळीवर तपास करत आहे. यवतमाळ, हिंगोली, नांदेड, वाशिम आणि हिमायतनगर या भागांतील 'मिसिंग' तक्रारींची पुन्हा पडताळणी केली जात असून सीमावर्ती भागातील CCTV फुटेजही तपासले जात आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलीस लवकरच या गुन्ह्याचा उलगडा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या