धम्मपरिषदेसाठी मुळावा सज्ज, पण रस्ता मात्र बेहाल! आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या आगमनापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.


ढाणकी प्रतिनिधी: मुळावा येथील ऐतिहासिक धम्मदूत बुद्धविहार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १ आणि २ फेब्रुवारी २०२६ रोजी 'अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे' भव्य आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या परिषदेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन डांबरीकरण करावे, अशी मागणी अॅड. डी. के. दामोधर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांची उपस्थिती.

या दोन दिवसीय धम्मपरिषदेसाठी श्रीलंकेचे खासदार पू. भदंत अतुरलिये रतन धेरो हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच अनेक विदेशी भिक्खू, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो उपासक-उपासिका दरवर्षी मुळावा येथे येतात.

अपघाताची भीती आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ते बुद्धविहार (शांतीनगर) या रस्त्याचे केवळ खडीकरण झाले असून, त्याचे डांबरीकरण अद्याप रखडलेले आहे. खडीकरण झालेल्या रस्त्यामुळे धुळीचा त्रास आणि वाहन घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

तसेच, मुळावा ते भांबरखेडा हा रस्ता गेल्या २ वर्षांपासून रखडलेला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. मंगलमयी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या दोन्ही रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची गरज आहे.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला इशारा

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. डी. के. दामोधर यांच्यासह संबोधी गायकवाड (तालुका अध्यक्ष), राजुभाऊ वाभाडे, अमोल कांबळे (तालुका उपाध्यक्ष), ऋषिकेश कवडे आणि अनाथपिंडक खडसे यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. जर वेळेत रस्त्याचे काम झाले नाही, तर येणाऱ्या हजारो अनुयायांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा सूर उमटत आहे.

धम्मपरिषदेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना आता सार्वजनिक बांधकाम विभाग यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या