प्रशासनाचा 'ट्रिपल' लोड, एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर तीन शहरांची धुरा; ढाणकीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी कधी मिळणार?


ढाणकी प्रतिनिधी: एकीकडे शहरांचा विस्तार वाढत आहे, नागरी समस्या जटील होत आहेत, मात्र प्रशासकीय पातळीवर ढाणकी शहराच्या नशिबी अद्यापही 'प्रभारी' कारभारच असल्याचे दिसून येत आहे. सध्या उमरखेडचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्याकडे उमरखेड नगरपालिकेसह  महागाव आणि ढाणकी अशा दोन महत्त्वाच्या नगरपंचायतींचा पदभार आहे. एकाच अधिकाऱ्याकडे तीन शहरांची जबाबदारी असल्याने ढाणकीच्या विकासकामांचा 'वेग' मंदावला असून, शहराला पूर्णवेळ मुख्याधिकारी कधी मिळणार, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. डॉ. अजय कुरवाडे हे सक्षम अधिकारी आहेत परंतु उमरखेड सारख्या मोठ्या शहराचा व्याप सांभाळताना त्यांना महागाव आणि ढाणकी या दोन नगरपंचायतींना पुरेसा वेळ देणे कठीण जात आहे. तीन शहरांचे अंतर, तिथल्या स्थानिक समस्या, बैठका आणि शासकीय कामे यामुळे त्यांची मोठी ओढाताण होत आहे. याचा थेट परिणाम ढाणकी शहराच्या स्वच्छतेवर, पाणीपुरवठ्यावर आणि प्रलंबित विकासकामांवर होताना दिसत आहे.  पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे अनेक महत्त्वाच्या योजनांच्या फायलींवर स्वाक्षरी होण्यास विलंब लागतो. तसेच मुख्याधिकारी आठवड्यातून ठराविक दिवस किंवा वेळच उपलब्ध असल्याने सर्वसामान्यांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रभारा मुळे शहराच्या दीर्घकालीन विकासाचे नियोजन कागदावरच राहण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे. ढाणकी नगरपंचायतीची स्थापना होऊन मोठा काळ लोटला असला तरी, अद्याप शासनाला या शहरासाठी स्वतंत्र मुख्याधिकारी देता आलेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी व नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी  या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या