ढाणकी (प्रतिनिधी): मुरली बांधारा परिसरात आज सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह पोत्यात (फारीत) बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर इसमाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीपात्रात फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दुर्गंधीमुळे प्रकार उघडकीस मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी काही स्थानिक नागरिक मुरली बांधाऱ्याच्या परिसरातून जात असताना त्यांना उग्र दुर्गंधी आली. परिसरात पाहणी केली असता, पाण्याजवळ एक पोते दोरीने घट्ट बांधलेल्या संशयास्पद स्थितीत पडलेले दिसले. नागरिकांनी तातडीने याची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला दिली.
पोलिसांची घटनास्थळी धाव घटनेची गांभीर्य ओळखून ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, पोलीस शिपाई दत्ता कवडेकर आणि प्रवीण जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून जेव्हा ते पोते उघडण्यात आले, तेव्हा त्यात अंदाजे ३० ते ३२ वयोगटातील एका पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून, ही हत्या अंदाजे १० दिवसांपूर्वी झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळीच शवविच्छेदन:- मृतदेहाची अवस्था पाहता, डॉ. हांडे यांनी नदीकाठी घटनास्थळीच जाऊन शवविच्छेदन केले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. मृतदेह फारीत गुंडाळून फेकलेला असल्याने ही नियोजनबद्ध हत्या असल्याचे दिसून येत आहे.
तपासाची चक्रे फिरली "आम्ही सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहोत. परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी सुरू आहे. लवकरच मृताची ओळख पटवून आरोपींना अटक करण्यात येईल," असा विश्वास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे ढाणकी परिसरात भीतीचे वातावरण आहे.

0 टिप्पण्या