ढाणकी (प्रतिनिधी): शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर आयुष्यातील संकटांशी दोन हात करण्याचे बळ मिळवणे होय. हेच ब्रीदवाक्य जपत सुमारे २५ वर्षांपूर्वी बिटरगाव (बु.) येथे विनोद सुधाकर गजभिये या तरुण शिक्षकाने सुरू केलेली 'नापासांची शाळा' आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेल्या या 'मुक्तांगणाने' शेकडो मुलींच्या आयुष्याला नवी दिशा दिली असून, ही शाळा पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
कुडाच्या घरापासून सुरू झाला प्रवास.
बी.एड. पदवीधर असलेले विनोद गजभिये यांनी सामाजिक चळवळीचा वारसा जपत, गावात इंग्रजी विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग सुरू केले. ज्या मुलींचे शिक्षण दहावी-बारावीत अपयश आल्यामुळे थांबले होते, त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. अत्यल्प शुल्क आणि गरीब मुलींसाठी मोफत शिक्षण, हे या शाळेचे वैशिष्ट्य होते.
केवळ अभ्यासच नाही, तर संस्कारांचे केंद्र.
या शाळेत केवळ विषयांची तयारी करून घेतली जात नव्हती, तर मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आत्मरक्षण, व तंदुरुस्ती: समाजातील अपप्रवृत्तींना ओळखणे आणि स्वतःचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण, कौशल्य विकास: संवादकौशल्य, स्टेज डेरिंग आणि लेखन कौशल्यावर विशेष भर दिला होता.
आजच्या 'यशस्वी' मुली हीच शाळेची पावती.
या शाळेतून बाहेर पडलेल्या मुली आज केवळ गृहिणी म्हणून मर्यादित न राहता, मोठ्या शहरांमध्ये अभियंता, डॉक्टर, पोलीस, तलाठी, परिचारिका आणि बँक कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आकोली, मोरचंडी, जेवली यांसारख्या अनेक गावांतील मुली या शाळेमुळे स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.
पुन्हा सुरू होणार का ‘ती’ शाळा?
विनोद गजभिये सरांना शासकीय नोकरी लागल्यानंतर हा उपक्रम थांबला होता. मात्र, परिसरातील वाढती गरज लक्षात घेता, उच्चशिक्षित अभियंता स्मिता बंडेवार या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
"या भागात अनेक दिवसांपासून ‘नापासांची ती शाळा’ बंद आहे. ती शाळा पुन्हा सुरू होणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून गोरगरीब मुलींना पुन्हा एकदा विकासाची संधी मिळेल." — स्मिता बंडेवार, बिटरगाव बु.
"बिटरगाव सारख्या दुर्गम भागात गजभिये सरांसारखे संवेदनशील शिक्षक मिळाले, तरच खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन घडेल. ही शाळा पुन्हा सुरू झाल्यास 'बंदी' भागातील शैक्षणिक चित्र नक्कीच बदलेल." - अमित कांबळे बिटरगाव बु.

0 टिप्पण्या