ढाणकी प्रतिनिधी: विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्याजवळील पैनगंगा नदी पात्रात एका ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा प्रकार प्रथमदर्शनी खुनाचा असल्याचे समोर येत असून, बिटरगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
सहस्त्रकुंड धबधबा आणि पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलाचा फायदा घेत अज्ञात इसमांनी एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरला आणि नदीपात्रात फेकून दिला. काल हा मृतदेह तरंगताना आढळून आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाची अवस्था पाहता, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह येथे आणून टाकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
ओळख पटवण्यासाठी 'हिंगोली' कनेक्शनचा आधार.
मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, मृताच्या अंगावर असलेल्या टी-शर्टवर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चित्र आणि नाव आहे. या महत्त्वाच्या धाग्यावरून हा तरुण मराठवाड्यातील किंवा हिंगोली जिल्ह्यातील असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ आणि २३८ अंतर्गत गुन्हा (०२/२०२६) दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी ४ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. लगतच्या जिल्ह्यातील पोलीस स्टेशनशी संपर्क साधून बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.
परिसर बनतोय गुन्हेगारांचा 'सेफ झोन'?
सहस्त्रकुंड आणि आसपासचे पैनगंगा अभयारण्य हे तेलंगणा, विदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर आहे. घनदाट जंगल आणि नदीचा विस्तीर्ण प्रवाह यामुळे दूरवर गुन्हा करून येथे मृतदेहाची विल्हेवाट लावणे सोपे जात असल्याचे चित्र आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या असल्याने या भागातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मृत व्यक्तीबद्दल किंवा परिसरातील संशयास्पद हालचालींबद्दल कोणालाही काही माहिती असल्यास त्यांनी तत्काळ बिटरगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, मृतदेहाचे शवविच्छेदन करून मुरली गावातील गायरान जमिनीवर पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला.

0 टिप्पण्या