काळ झपाट्याने बदलला, काळा सोबत माणसेही बदलली आणि त्यासोबतच वडिलोपार्जित वर्षानुवर्ष जपत चाललेली कलाही हरवत गेली. बहुरूपी कलावंत हा या समाजातील असा उपेक्षित घटक आहे जो काळाच्या ओघात झपाट्याने मागे पडला. वेगवेगळी सोंग घेऊन समाजाचे मनोरंजन करणे हा बहुरूपी कलावंतांचा मुख्य व्यवसाय आणि याच कलेच्या आधारावर त्यांनी वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबाचा गाडा हाकला. आज A I च्या जगामध्ये बहुरूपी मात्र अशाप्रकारे हरवला की, समोरच्या पिढीला बहुरूपी कोण होता हे दाखवणे सुद्धा दुरापास्त झालेले आहे. सोमवार हा ढाणकी शहराचा बाजारचा दिवस असतो. या दिवशी खेड्यापाड्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक आपले दैनंदिन कामे करण्यासाठी व बाजारासाठी शहरात येत असतात. अशाच या बाजाराच्या गर्दीमध्ये सुनील शिंदे नामक युवक पोलीस अधिकाऱ्यांच्या वेषामध्ये दुकानांमध्ये जाऊन बक्षीसी मागत होता. त्याच्याशी अधिक संवाद साधल्यानंतर त्याने आपल्या या व्यवसायाबद्दल माहिती दिली. सुनील म्हणतो की, पूर्वीप्रमाणे लोक आता या कलेला दाद देत नाहीत. दिवसाकाठी आजच्या स्थितीला 200 ते 300 रुपये उरतात. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामधून महिला पुरुष त्यांना आर्थिक मदत व अन्न धान्य देत असत. आता मात्र धान्य तर दूरच मात्र थोडेसे पैसे मिळणे ही जिकिरीचे झालेले आहे. या महागाईच्या काळात या तटपुंज्या मिळकतीवर कुटुंब चालवणे सुद्धा मोठे मुश्किल होत आहे. सुनील सारखे असंख्य युवक आज रोजगाराच्या शोधात आहे. मात्र शिक्षणाअभावी म्हणा किंवा इतर कारणाने त्यांना रोजगार मिळत नाही. आणि वडिलोपार्जित चालत आलेल्या बहुरूपी कलेवर त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागतो. शासनाने अशा कलावंतांना आर्थिक मदत करणे गरजेचे झालेले आहे. सुनील शिंदे सारखे युवक आजच्या काळामध्ये लुप्त होत चाललेली कला जोपासत असून पुढील पिढीसाठी तो एक प्रकारचा ठेवाच म्हणावा लागेल.

0 टिप्पण्या